परतूर विधासभा : बबनराव लोणीकर यांच्या विरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल , म्हणाले ‘मी तांड्यात पैसे दिलेले आहेत….’

परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्याविरोधात सेवली पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मतदारसंघातील नेर-सेवली परिसरातील तांड्यांवर प्रचारादरम्यान लोणीकरांनी ‘तांड्यामध्ये कमळाच्या फुलाला लीड आहे, सगळ्या तांड्यात मी पैसे दिलेले आहेत आणि म्हणून या निवडणुकीत मला कसलीही भीती नाही,आपण सगळे माझ्या सोबत आहात, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आपण सगळ्यांनी रॅलीत यायचं आहे, मोदीजींच्या सभेला जायचं आहे’, असे विधान केले होते. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
तर लोणीकरांच्या या विधानानंतर मोहाडी तांडा येथील विजय पवार यांनी निवडणूक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी बबनराव लोणीकर यांना २४ तासाच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याबाबत नोटीस बजावली होती. विहीत मुदतीत लोणीकरांनी समाधानकारक स्पष्टीकरण सादर न केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या आदेशावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी लोणीकरांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
बबनराव लोणीकरांच्या या विधानानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांनी ‘जिंकण्यासाठी लाेणीकर भ्रष्ट मार्गांचा अवलंब करत आहेत, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आचारसंहिता भंगाचा गुन्हा दखल करून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी,’ अशी मागणी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
यावर लोणीकर यांनी खुलासा केला होता की, विविध तांड्यांच्या विकासासाठी आपण निधी दिला असे सांगण्याचा माझा यामागे उद्देश होता, ग्रामीण भागातील लोकांना निधी दिला हा शब्दप्रयोग समजण्यास अवघड जाते, म्हणून तांड्यांना पैसे दिले असे आपण म्हटलो होतो. मात्र माझ्या विधानाचा विपर्यास करून, व्हिडिओमध्ये तोडफोड करून खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.