भगवान विष्णूचा दहावा अवतार सांगणाऱ्या ‘कल्की बाबा ‘ कडे सापडले कोट्यवधींचे घबाड , रोख , हिरे , ८८ किलो सोने आणि १८ कोटीच्या परदेशी चलनाचा समावेश

आयकर विभागाने कथित गुरु कल्की भगवान यांच्या बेंगळुरू येथील आश्रमावर छापा मारला तेव्हा तब्बल ९३ कोटी रुपयांचे घबाड जप्त केले आहे. याशिवाय दुसऱ्या आश्रमांवर मारलेल्या छाप्यात 409 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचंही समोर आलं आहे. स्वत:ला भगवान विष्णूचा १० वा अवतार असल्याचे सांगणाऱ्या या कथित गुरूने सुरुवातीला लाइफ इन्शुरन्सचा क्लार्क म्हणून काम करायला सुरुवात केली होती. आता मात्र हा अवतारी बाबा म्हणून ओळखला जात होता.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कल्की आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांच्या आंध्र प्रदेश, तामिळनाडुसह ४० ठिकाणी छापा मारण्यात आला. आयकर विभागानं एकाच वेळी चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू या ठिकाणी छापा मारला. कल्कीने त्यांच्या समुहाची स्थापना १९८० मध्ये केली होती. त्यानंतर याचा विस्तार झाला. यामध्ये रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन आणि क्रीडा क्षेत्राचा समावेश आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही समुहाने पाय पसरले आहेत. ट्रस्टच्यावतीने समूह दर्शन आणि अध्यात्म यामध्ये कार्यक्रम आणि ट्रेनिंग प्रोग्रॅम असायचा. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून परदेशी नागरीकांनाही भूरळ पाडली. यामुळे परदेशी चलनही मोठ्या प्रमाणावर मिळालं.
ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या पावत्यांमध्ये हेराफेरी केली जात होती. ते पैसे रिअल इस्टेटमध्ये वापरले जात होते. याच्या जोरावर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडुत मोठ्या प्रमाणावर जमीनीची खरेदी केली. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात अनेक गैरव्यवहार समोर आले आहेत. आश्रमाला लोकांकडून मिळालेल्या डोनेशनची माहिती लपवण्यात आली. आश्रम आणि समुहातील स्टाफ अकाउंट बुकशिवाय रोख रक्कमही ठेवत असत. याशिवाय प्रॉपर्टी चढ्या भावाने विकून पैसे कमवत होते.
आयकर विभागाच्या छाप्यात २५ लाख अमेरिकन डॉलर म्हणजेज जवळपास १८ कोटी रुपयांचे परदेशी चलन मिळाले आहे. याशिवाय ८८ किलो सोनंही सापडलं आहे. याची किंमत २६ कोटी रुपये इतकी होते. तसेच ५ कोटी रुपयांचे हिरे आयकर विभागाला सापडले आहेत. या तपासात संपूर्ण ग्रुपच्या ५०० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती सापडली आहे.