Aurangabad Crime : तहसील कार्यालयात तोडफोड करणारा अडीच महिन्यानंतर गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

औरंंंगाबाद : तहसील कार्यालयात शिरुन दहशत माजविलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने अडीच महिन्यानंतर बुधवारी (दि.९) अटक केली. सय्यद फैसल सय्यद शौकत (वय १९, रा. गल्ली क्र. ६, इंदिरानगर, बायजीपुरा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.
तहसील कार्यालयातील मतदार संघ १०९ चे सुपरवायझर मोमीन मोहम्मद जफर सलीम (वय ५३, रा. प्लॉट क्र. ४, कृषीनारा हाऊसिंग सोसायटी, एएमसी कंपाऊंड, सेंट्रलनाका रोड) हे ३१ जुलै रोजी कर्तव्य बजावत होते. सायंकाळी पाचच्या सुमारास कार्यालयात शिरलेल्या तिघांनी त्यांना आमच्या कर्मचा-याचा नंबर द्या असे म्हणत कार्यालयातील प्लास्टिकच्या खुच्र्या फेकून व शासकीय मालमत्तेची तोडफोड करुन नुकसान केले होते. तसेच मोमीन यांना शिवीगाळ करत अल्तमश कॉलनी व बायजीपुरा येथील फॉर्म का स्विकारत नाही असे म्हणून असभ्य वर्तन केले होते. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे, जमादार सैय्यद मुजीब अली, तुकाराम राठोड, गजानन मांन्टे, आनंद वाहुळ, राहुल खरात, शेख बाबर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.