महाराष्ट्र विधानसभा २०१९ : सख्खे भाऊ झाले पक्के वैरी , एक भाजपकडून तर दुसरा सेनेचा बंडखोर !!

सत्ता आणि राजकारण वर्तमानातले असो कि भूतकाळातले !! सत्ताकांक्षी राजकारण्यांना कुठलेही नाते समजत नाही मग वडील आणि मुलगा असो कि भाऊ भाऊ किंवा कुणीही असो सत्तेपुढे कुठलेही नाते राजकीय लोक मानायला तयार नसतात सातारा जिल्ह्यातील माण -खटाव तालुक्यात असाच प्रकार घडला आहे या मतदार संघात सख्खे भाऊ एकमेकांचे पक्के वैरी झाले आहेत. वास्तविक हि जागा महायुतीमध्ये भाजपला सुटली आहे तर सेनेत असलेल्या सख्या भावाने शिवसेनेकडून आपल्याच भावाविरुद्ध बंडखोरी केली आहे. आता दोन भावांमधला राजकीय तिढा कसा सोडवावा ? असा प्रश्न सेना -भाजपच्या नेतृत्वाला पडला आहे.
मराठवाड्यातही काका -पुतण्या समोरासमोर आहे तर भाऊ-बहीणही एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. याच मालिकेत साताऱ्यातील माण-खटाव हा मतदारसंघ सध्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे. कारण या मतदारसंघात दोन सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. काँग्रेसमधून आलेल्या जयकुमार गोरे यांना भाजपने तिकीट दिलं. पण त्यानंतर शिवसेनेनं शेखर गोरे यांना उमेदवारी देत जयकुमार गोरेंना आव्हान दिलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून माण-खटाव मतदारसंघात गोरे बंधूंमधील राजकीय संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा संघर्ष पुन्हा एकदा उभाळून वर आला आहे. त्यातच आता एकाला भाजप तर दुसऱ्याला शिवसेनेनं तिकीट दिल्याने गोरे बंधूंमधील राजकीय लढाई आणखीनच तीव्र होणार आहे. या मतदार संघात चौरंगी लढत असून जयकुमार गोरे- भाजप, शेखर गोरे- शिवसेना, प्रभाकर देशमुख- राष्ट्रवादी, अनिल देसाई, आमचं ठरलंय माण विकास आघाडी हे चार प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात शड्डू ठोकून उभे आहेत.
या निवडणुकीत भाजप -सेनेची युती झाली असली तरी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले असल्याने यंदाच्या निवडणुकीत युतीची स्थिती मजबूत दिसत असताना या दोन्हीही पक्षांना तिकीटवाटपानंतर बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. तिकीट न मिळाल्याने शिवसेना-भाजपमध्ये नाराज झालेल्या काही नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वाट धरली तर काहींनी अपक्ष लढत बंडखोरी करणंच अधिक पसंत केलं. शिवसेनेच्या काही बंडखोर आमदारांनी तर उद्धव ठाकरे यांना ” साहेब , तुम्ही फक्त गुलाल लावायलाच या ” असे सांगून बंडखोरी केली आहे हे विशेष. राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनाही बंडखोरीचा सामना करावा लागेल असे चित्र आहे.