मनोरंजन : ऑनलाईन सिनेमा लीक होऊनही ‘वॉर’ ने तीन दिवसात कमावला ९५ कोटींचा गल्ला !!

ऑनलाईन सिनेमा लीक होऊनही बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या ‘वॉर’ चित्रपटाची घोडदौड अजून सुरूच असून बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने शुक्रवारी २० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आत्तापर्यंत तीन दिवसात ‘वॉर’नं ९५ कोटींचा गल्ला जमावला आहे.
पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये दुर्गा पुजामुळं चित्रपटाचं दणक्यात प्रमोशन झालंय. त्यामुळं या राज्यांत चित्रपटाला चांगलाच रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. इतर, राज्यांतही चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. चित्रपटाला असाच प्रतिसाद मिळाला तर लवकरच ‘वॉर’ १०० कोटींच्या क्लबच्या यादीत पोहचेल.
सिनेसृष्टीतील हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या दोन बड्या स्टारची ऑनस्क्रीन अॅक्शन, संवाद, गाणी यासगळ्यांमुळं चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता होती. दरम्यान, ‘वॉर’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एंट्रीलाच जोरदार मुसंडी मारली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५३.३५ कोटींची कमाई करत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
या विक्रमामुळे ‘वॉर’ हा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा राष्ट्रीय चित्रपट आणि हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि यशराज फिल्म्सचा पहिल्याच दिवशी इतकी मोठी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. वॉर चित्रपट एकाचवेळी ५ हजार ३५० स्क्रीन्सवर झळकला आहे.
विशेष म्हणजे सिनेमा प्रदर्शित होऊन आठवडाही उलटत नाही तोच हृतिक आणि टायगर श्रॉफचा ‘वॉर’ सिनेमा ऑनलाइन लिक करण्यात आला आहे. तामीळ रॉकर्स या वेबसाइटवर हा सिनेमा लिक करण्यात आला. ऑनलाइन सिनेमा लीक झाल्यामुळं त्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, तिसऱ्या दिवशीही सिनेमानं २० कोटींपर्यंत मजल मारली.