Anantnag : पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयासमोर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, १० जखमी , पोलीस , पत्रकार आणि लहान मुलाचा समावेश

शुक्रवारी रात्री उशिरा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अतिरेकी हल्ला झाला असून त्यात १० लोक जखमी झाले असल्याचे वृत्त आहे . मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाच्या समोर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकून हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार , डीसी ऑफिसच्या बाहेर तैनात असलेले कर्मचारी हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यात १० लोक जखमी झाले. यात एक पोलीस कर्मचारी, एक पत्रकार आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.
या दहशतवादी हल्ल्यानंतर तातडीने सुरक्षा दलाची कुमक वाढवण्यात आली आणि परिसराला घेराव घालण्यात आला आहे . दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशनदेखील सुरू करण्यात आले आहे. शनिवारी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला दोन महिने पूर्ण झाले आहेत.