मी भारतीय आहे , माझा कुठलाही धर्म नाही , मी धर्म मानत नाही : अमिताभ बच्चन

माझा कोणताही धर्म नाही, मी भारतीय आहे. अशा शब्दात अमिताभ बच्चन यांनी नुकताच स्वत:च्या आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला. ‘मी कोणताही धर्म मानत नाही आणि कोणत्याही धर्माचे आचरण करत नाही’ असं त्यांनी गांधी जयंतीच्या निमित्तानं रंगलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ च्या विशेष भागात सांगितले.
गांधी जयंतीचे निमित्त साधून अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक किस्से त्यांनी यावेळी शेअर केले. अमिताभ यांचं आडनाव बच्चन का आहे याचा खुलासादेखील त्यांनी यावेळी केला. अमिताभ यांचे मूळ आडनाव बच्चन नसून श्रीवास्तव आहे असं ते म्हणाले. बच्चन हे त्यांच्या कुटुंबानं स्वीकारलेलं टोपण नाव आहे. बच्चन हे टोपणनाव स्वीकारण्यामागे अमिताभ यांचे वडील आणि हिंदीतील ख्यातनाम कवी हरिवंशराय बच्चन यांचा मोठा वाटा आहे.
अमिताभ म्हणाले कि , ‘माझे वडील हरिवंशराय बच्चन हे धर्म मानायचे नाहीत. कोणत्याही धर्माचे आचरण करण्यास त्यांचा विरोध होता. आमचे आडनाव श्रीवास्तव होते, परंतु, आम्ही या आडनावाचा, आमच्या जाती-धर्माचा कधीच उदोउदो केला नाही. आमच्या आडनावामुळे आम्हाला मिळालेली जात किंवा धर्म आम्ही मानला नाही. बच्चन या टोपणनावाने मी कोणत्या जातीचा किंवा धर्माचा आहे हे ओळखता येत नाही कारण बच्चन आडनाव कोणत्याच धर्माशी संबंधित नाही. त्यामुळे मला अभिमान आहे माझ्या वडिलांनी घेतलेल्या या निर्णयाची परंपरा टिकवणार मी पहिला आहे. ‘
बच्चन आडनाव आणि धर्माबद्दल बोलताना अमिताभ यांनी त्यांच्या बालपणी घडलेला एक प्रसंग सांगितला. ‘जेव्हा बालवाडीत माझे नाव दाखल करायचे होते त्यावेळी माझ्या वडिलांना हरिवंशराय बच्चन यांना त्यांचे आणि पर्यायानं माझं आडनाव विचारण्यात आले. त्यांनी शाळेचा दाखला भरताना बच्चन असंच आडनाव सांगितलं. त्यानंतर जनगणना होताना अनेक कर्मचारी माझ्याकडे येतात आणि मला माझा धर्म काय असं विचारतात. त्यावेळी माझा कोणताही धर्म नाही, मी भारतीय आहे.’ असं मी त्यांना सांगतो.