असत्याचे राजकारण करणारांना गांधी कसे समाजातील ? सोनिया गांधी यांचा सवाल

असत्याचे राजकारण करणाऱ्यांना गांधी सत्याचे पुजारी होते, हे कसे समजेल? सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्यांना गांधी अहिंसेचे पुजारी होते हे कसे समजेल?, अशी टीका सोनिया गांधी यांनी वर्तमान परिस्थितीवर भाष्य करताना केली. स्वत:ला सर्वोच्च समजणाऱ्यांना महात्मा गांधीजी यांनी केलेल्या त्यागाची किंमत कशी कळणार? तसेच अपप्रचाराचे राजकारण करणाऱ्यांना गांधीजींचे अहिंसेचे तत्वज्ञान पटणार नाही, असेही सोनिया यांनी म्हटले आहे.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त काँग्रेसने सुरू केलेल्या पदयात्रेचा सांगता करताना सोनिया गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या देशातील योगदानाचं स्मरण केलं. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनीच महात्मा गांधींच्या मार्गाचा अवलंब करून देशाचा विकास केला. काँग्रेस नेहमीच गांधी विचारावर चालली. पूर्ण सत्तेचा हव्यास असलेल्यांना गांधीजी कधी कळलेच नाही, अशी टीका सोनिया यांनी केली.
सोनिया गांधी यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या कि , गांधी अहिंसा आणि करुणेचे पुजारी होते. त्यांनी द्वेषाला कधीही थारा दिला नाही. असत्याचं राजकारण करणाऱ्यांना हे कधीच समजणार नाही, असं सांगतानाच गेल्या पाच वर्षात देशाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गांधीजी आज असते तर ही परिस्थिती पाहून तेही दु:खी झाले असते, अशा शब्दांत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग अनुसरण्याची प्रेरणा दिली. गांधींच्या विचारामुळेच आजचा भारत घडला आहे, असं सांगतानाच गांधींजींचे नाव घेणे सोपे आहे, पण त्यांच्या मार्गावर चालणं तेवढंच कठीण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.