नाशिकमध्ये विजेच्या धक्क्याने सासू-सुनेचा मृत्यू , दोन जखमी , सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सासू-सुनेचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. सिडको उत्तमनगर भागातील शिवपुरी चौकात केदारे कुटुंबातील सासू सुनेचा महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या तारांचा धक्का जागीच मृत्यू झाला. याशिवाय या घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी देखील झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नाशिकच्या सिडको परिसरातील विजेच्या तारेंचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील विजेच्या तारा भूमिगत कराव्यात अशी मागणी येथील नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. मात्र, याकडे प्रशासन दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून, शेकडो रहिवाशांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना दोषी धरत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सोजाबाई मोतीराम केदारे (८०) आणि सिंधुताई शांताराम केदारे (४०) अशी मृतांची नावे आहेत. तर नंदिनी शाताराम केदारे (२३) आणि शुभम शांताराम केदारे (१९) अशी गंभीर झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोजाबाई केदारे या आजी सकाळी आपल्या घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालत होत्या. यावेळी अचानक त्यांचा धक्का विजेच्या तारेला लागला आणि त्यांना शॉक बसला. सासूला विजेचा धक्का लागल्याचं पाहून सुनबाई सिंधू केदारे मदतीसाठी धावून गेल्या, पण त्यांनाही शॉक लागला. त्यानंतर त्यांची मुलगी आणि मुलानेही वाचवण्यासाठी धाव घेतली पण त्यांनाही जोरदार झटका बसला. या घटनेत सासू-सुनांचा मृत्यू झाला. तर जखमीनावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.