Maharashtra Vidhansabha 2019 : महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल, साताऱ्याची पोटनिवडणूक मात्र लांबणीवर

महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि हरयाणा दोन्ही विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. साताऱ्याच्या लोकसभेच्या पॉट निवडणुकीचा कार्यक्रम मात्र सध्या होणार नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दोन्ही राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदार आहेत. विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.
दरम्यान साताऱ्याची पोटनिवडणूक मात्र आता लांबणीवर गेली आहे. साताऱ्याची पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत जाहीर करण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात दोन्हीही निवडणूका एकत्र होतील असे म्हटले होते पण तसे झाले नाही.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना जारी होणार
४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी