वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा आघाडी करायची असेल, तर आम्ही तयार आहोत : खा. इम्तियाज जलील

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा आघाडी करायची असेल, तर आम्ही तयार आहोत, असं स्पष्टीकरण इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत दिलं. शिवाय प्रकाश आंबेडकर हे आमचे मोठे बंधू आहेत, त्यांना वाईट वाटलं असेल तर मी माफी मागायला तयार आहे, असंही ते म्हणाले.
इम्तियाज जलील यांनीच काही दिवसांपूर्वी आघाडी तोडण्याची घोषणा केली होती. वंचितकडून केवळ आठ जागांचा प्रस्ताव दिल्यामुळे आघाडी तोडत असल्याचं ते म्हणाले होते. यानंतर काही उमेदवारही एमआयएमने जाहीर केले होते. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही एमआयएमसाठी दारं खुली असल्याचं म्हटलंय. दरवाजे त्यांनी बंद केले असून चावी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे चर्चेसाठी त्यांनीच यावं, असंही ते म्हणाले. वंचितकडून मुस्लीम समाजाचे २५ उमेदवार दिले जाणार असल्याची माहितीही प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
दरम्यान आघाडी तोडत असल्याची घोषणा करताना इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकरांवर काही आरोपही केले होते. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला कधीही ५० जागा मागितल्या नव्हत्या, आमची ७६ जागांची मागणी होती. पण वंचितमध्ये काही संघाचे लोक घुसले का, की ज्यांनी आम्हाला एवढ्या जागा देऊ नये असं सांगितलं, असा सवाल एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता. प्रकाश आंबेडकरांचे उपकार कधीही विसरणार नाही, पण मुस्लीम चेहरा म्हणून प्रमोट करायचं आणि नंतर अस्तित्व नाकारायचं हे चालणार नाही. आम्हाला ४० ते ४० जागा दिल्यास आम्ही सोबत जाऊ, असंही जलील म्हणाले होते.