पाकिस्तान भारतात युद्ध झाल्यास शेवटी अणुयुद्धाशिवाय पर्याय नाही : इम्रानखान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी अल जझीरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारतावर आगपाखड करत असतानाच पारंपरिक युद्ध झाल्यास पाकिस्तान भारतासोबत जिंकू शकणार नाही याची अप्रत्यक्ष कबुलीच दिलीय. इम्रान खान म्हणाले, आम्हाला युद्ध नकोय. आम्ही कधीही पहिले अणुयुद्ध सुरू करणार नाही. मी शांततेचा पुरस्कर्ता आहे.
युध्दाने कधीही प्रश्न सुटत नाहीत आणि कुणाचं भलं झालं नाही. पण पारंपरिक युद्ध झालंच तर त्यात पाकिस्तानचा परभव होत असेल तर आमच्या समोर दोन पर्याय उतरतील. एक म्हणजे आत्मसमर्पण करणं आणि दुसरं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत लढणं. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचे परिणाम हे अतिशय भयानक असतात असं म्हणत त्यांनी अणुयुद्धाची धमकीही दिली.
संयुक्त राष्ट्र आणि संस्थांशी आम्ही संपर्क केला असून त्यांनी भारतावर दबाव आणावा असंही ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रानं या आधीच काश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय तोडगा काढावा असं म्हणत पाकिस्तानची मागणी फेटाळून लावलीय. तर अमेरिकेनेही हा प्रश्न शांततेच्याच मार्गाने सोडवावा असं म्हटलंय. त्यामुळे या प्रश्नाचं आंतराष्ट्रीयीकरण करण्याचा पाकिस्तानचा डाव उलटला आहे. त्याचमुळे इम्रान खान हे पाकिव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन चिथावणीखोर भाषणं करत आहेत. एलओसीवर केव्हा जायचं हे मी काश्मिरी तरुणांना सांगणार आहे असं त्यांनी शुक्रवारी मुजफ्फराबादमध्ये भाषण करताना सांगितलं होतं.