Andhra Pradesh : गोदावरी नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश येथे गोदावरी नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. बोट बुडाल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, २३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. या पुरातून वाचविण्यासाठी ६० जणांना घेऊन ही बोट निघाली. दरम्यान कच्चुलुरू येथे ही बोट बुडाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळातर्फे या बोटीचे परिचालन सुरू होते. या बोटीत प्रवास करत असणारे अनेक जण अद्यापही बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर बचाव कार्यावर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी त्या भागातील मंत्र्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
या दुर्घटनेबद्दल ट्विट करताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे कि , गोदावरी नदीत बोट बुडाल्याची घटना वेदनादायी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील ट्विटच्या माध्यमातून या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान, बोटीला अपघात झाला, त्याठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू असून, हेलिकॉप्टरची मदतही घेतली जात आहे.