मोठी बातमी : काँग्रेसकडून “या” उमेदवारांची नावे झाली फायनल, काँग्रेसच्या होमवर्कला प्रारंभ

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ६० जागांवर उमेदवारांच्य़ा नावाची चर्चा करण्यात आली असून ५० जागांवर उमेदवारांची नावं फायनल झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोणत्याही जाहीर चर्चेविना आता काँग्रेसनंही विधानसभेचं जोरदार प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली असल्याचं वृत्त आहे.
दरम्यान भाजप-शिवसेनेमध्ये जागावाटपावरून सुरु असलेला वाद अद्याप संपुष्टात आलेला नाही . कारण विधानसभेसाठी युतीचा ५०-५० फॉर्म्युला भाजपला अमान्य आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत संभाव्य वाद होण्याची शक्यता आहे. हि शक्यता लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस उमेदवारी जाहीर करणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे.
राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी ५० जागांवर उमेदवारांची नावं फायनल करण्यात आली आहेत. यामध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, मुत्तेमवार यांच्यासह अनेक दिग्गजांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर यावेळी काँग्रेस मोठ्या चेहऱ्यांना मैदानात उतरवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय विद्यामान आमदारांनाही विधानसभेत संधी मिळणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, १७ सप्टेंबरला महाराष्ट्र स्क्रीनिंग कमिटीची बैठक पार पडणार आहे. १८ सप्टेंबरला महाराष्ट्रातील निवडणुकांचं प्लॅनिंग करण्यासाठी आणखी एक बैठक पार पडणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी महासचिव मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे.