मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईचा फुगा फेकणाऱ्या ‘स्वाभिमानी’ तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्यावेळी त्यांच्या ताफ्यावर शाई फेकणाऱ्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेची प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या शर्मिला सुभाष येवले यांच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अकोले येथे शुक्रवारी ही घटना घडली होती.
मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांना अकोले येथून भाजपकडून उमेदवारी देऊ नये, सरकारचे महापोर्टल बंद करावे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या करीत येवले यांनी शाईचा फुगा वाहनांच्या दिशेने फेकला होता.
याप्रकरणी पोलीस हवालदार सचिन शिंदे यांनी दिलेल्या तक्रारी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांच्या गाड्यांचा ताफा कोल्हार-घोटी राज्यमार्गावर अकोले सुगाव शिवारात रोकडोबा मंदिराजवळ जवळ येताच शर्मिला येवले हिने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिशेने शाईचा फुगा फेकला. मात्र हा फुगा ताफ्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता.