राष्ट्रवादी पुन्हा : शरद पवार निघताहेत महाराष्ट्राच्या झंझावाती दौऱ्यावर, बोल बैठक घेऊन कार्यकर्त्यांना करणार चार्ज !!

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील होणाऱ्या गळतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करून त्यांच्यातील उत्साह वाढविण्यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार येत्या १७ सप्टेंबरपासून आपल्या झंझावाती दौऱ्याला प्रारंभ करीत आहेत. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्याची सुरुवात ते सोलापूर येथून करणार आहेत.
त्यांचा हा दौरा १७ ते २२ सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात पार पडणार आहे . यावेळी सभा घेण्यावर भर देण्यात येणार नाही. त्याऐवजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका घेण्यात येणार आहेत. १७ सप्टेंबरपासून सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा याठिकाणी बैठका घेणार आहेत.
शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप- सेनेच्या कारभारावर टीका सुरु केली आहे. शिवस्वराज्य यात्रेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार निवडणूकीच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौरा करणार आहेत.