मोठी बातमी : पवारांच्या बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेशयात्रेत पोलिसांना का करावा लागला (सौम्य ) लाठीमार ?!!

बारामतीत महाजनादेश यात्रा घेऊन आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीच्या रोषाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणा दरम्यान गोंधळ घातल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे सभा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अडवण्याचाही प्रयत्न झाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या वाहनापुढे येत निषेधाच्या घोषणा दिल्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज बारामतीत पोहोचली. यावेळी फडणवीस यांनी शरद पवारांनी चूक केल्यानंच आज राष्ट्रवादीला मोठी गळती लागल्याची टीका केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे सभेला आलेले लोकही बिथरले आणि सभेत एकच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी राष्ट्रवादीच्या गोंधळी कार्यकर्त्यांवर लाठीमार करत त्यांना पांगवलं. सुमारे अर्धातास हे नाट्य सुरू होतं. त्यानंतर गोंधळ शांत झाल्यावर मुख्यमंत्र्यांनीही अधिक भाषण न करता त्यांचं भाषण आटोपतं घेतलं.
यावेळी फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला केला. गेल्या सत्तर वर्षांमध्ये ३७० कलम रद्द झालं नाही, ते आत्ता रद्द झालं. नरेंद्र मोदी नावाचा वाघ त्यासाठी होता, असं सांगतानाच आमच्या विकासकामांमुळेच तिकडे गळती लागलीय. कारणं बुरे काम का बुरा नतीजा बुरा होता है, असा टोला त्यांनी हाणला. ज्यावेळी बारामतीकडे येण्यासाठी मी निघालो, तेव्हा आपल्या साऊंड सिस्टीमला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला असल्याचं मला सांगण्यात आलं. एवढा धसका त्यांनी घेतलाय. पण आम्ही नरेंद्र मोदी यांचे बाशींदे आहोत. हे लक्षात ठेवा, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
.