गणपती विसर्जनाच्या दरम्यान बोट उलटून ११ लोक ठार

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे गणपती विसर्जनाच्या दरम्यान बोट उलटून ११ लोक बुडाल्याची घटना घडली आहे. बुडालेल्या बोटीत एकूण १८ लोक होते. सात बेपत्ता लोकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. भोपाळमधील खटलापुरा घाटावर शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बोटीत बसलेले लोक विसर्जनासाठी तलावाच्या दुसऱ्या काठाकडे चालले होते. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले होते. याच बोटीवर गणेशमूर्ती होती. ही मूर्ती देखील मोठी होती. विसर्जनासाठी मूर्ती पाण्यात उतरवताना बोट एका बाजूला कलली आणि उलटली.
अपघाताची माहिती मिळताच प्रशासनानं तात्काळ मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. घटनास्थळी जीवरक्षकांचं अतिरिक्त पथक तैनात करण्यात आलं आहे. आतापर्यंत ११ मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. इतरांचा शोध सुरू आहे. मध्य प्रदेशचे सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.