मुंबई ठाण्यात येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई आणि उपनगरांसह राज्यातील काही भागात येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मुंबई, उपनगरांसह, कोकण किनारपट्टी, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या २४ तासांत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सांताक्रूझ वेधशाळेने गेल्या २४ तासांमध्ये ४१.३ मिमी इतक्या पावसाची नोंद केली आहे. तर कुलाबा वेधशाळेने ६.२ मिमी इतक्या पावसाची नोंद केली आहे.
१ जून पासून कुलाबा वेधशाळाने २३४६.६ मिमी इतक्या पावसाची, तर सांताक्रूझ वेधशाळेने ३३९८.६ मिमी इतक्या पावसाची नोंद केली आहे.
गेल्या २४ तासांमध्ये कोसळलेला पाऊस पाहता मुंबई, उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यात रिमझिम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे (पश्चिम विभाग) उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.