उदयनराजेंचे भाजप प्रवेशाचे घोडे साताऱ्यातच अडले , राजेंचे तळ्यात-मळ्यात !!

भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीत राहायचं, यासाठी उदयनराजेंनी आज पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर उदयनराजे यू-टर्न घेत राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेअवंती आले राजेंच्या मना तेथे कोणाचे चालेना , अशी उदयनराजेंची अवस्थ आहे . त्यामुळे राष्ट्रवादी असो कि भाजप त्यांचा निर्णय त्यांच्यावर सोडावा लागणार आहे. भाजप प्रवेशावरून राजेंचे असे तळ्यात मळ्यात चालू आहे.
‘आहोत तिथंच चांगलं आहे. भाजपमध्ये जाणं धोक्याचं ठरू शकतं,’ असं म्हणत जवळच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीतच राहण्याची विनंती केली आहे. त्यामुळे उदयनराजेंनीही भाजप प्रवेशाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली असून ते राष्ट्रवादीतच राहतील, अशी शक्यता आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.
राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. ‘या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,’ असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठी तितकंच सोपं नसल्याचं दिसत आहे.