मुंबई , कोकणात पुढील चार तास मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाण्याला झोडपून काढणाऱ्या पावसाचा कहर अद्याप थांबलेला नाही. पुढच्या चार तासात मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढचे चार तास सतर्क रहावे लागणार आहे.
मुंबई-ठाण्यात सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. संध्याकाळी पावसाचा जोर आणखीनच वाढला होता. पुढच्या तार तासात मुंबईत आणखी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं असून गणेश विसर्जनासाठी चौपाट्यांवर आलेल्या गणेश भक्तांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आज सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. हिंदमाता, दादर, परळ, विक्रोळी, घाटकोपर, शीव, माटुंगा, चुनाभट्टी, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, मिलन सबवे, अंधेरी, सांताक्रुझ आदी भागात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी उशिर झाला.