राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश नाही, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही, असं आश्वासन पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी येवल्यातील पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांना दिले. भुजबळ यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी राऊत यांच्याकडे केली होती. येवला मतदारसंघातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांची नाशिकमध्ये भेट घेतली. भुजबळ यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी राऊत यांच्याकडे केली. त्यावर भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही, असं आश्वासन राऊत यांनी दिलं.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले कि , शिवसेनेमध्ये मुलाखती होत नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त बैठका होतात.गणेशोत्सवानंतर कधीही निवडणुका जाहीर होतील. उत्तर महाराष्ट्र हे सध्या राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. मी आहे तिथे बरा आहे असं काल भुजबळ स्वतः म्हणाले. त्यामुळं चित्र स्पष्ट झाले आहे. सगळ्यांना पक्षात घ्यायला आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही. आम्ही पारखून नेत्यांना पक्ष प्रवेश देत आहोत. भाजप राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतो, आम्ही देखील तयारी करत आहोत. आर्थिक मंदीमुळे या देशात बेरोजगारी वाढत आहे. रशियासारखी परिस्थिती होऊ नये . आर्थिक मंदीवर सरकारने लवकर उपायोजना कराव्यात काँग्रेस सरकारच्या काळातही मोठी मंदी आली होती; मात्र मनमोहन सिंग यांनी अत्यंत उत्तम काम करून देशाला मंदीतून बाहेर काढलं असेही राऊत म्हणाले. आगामी निवडणुकीत समान जागावाटप होणार असल्याचे सांगून ते म्हणाले कि , अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात हे ठरलं आहे. नारायण राणेंना भाजपने घ्यावं की नाही हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या प्रवेशाला आमचा विरोध नाही. पण छगन भुजबळ शिवसेनेत येणार नाहीत.