मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण : महिला आयोगाचे पोलिसांना तपास अहवाल सादर करण्याचे आदेश

चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून या प्रकरणाचा तपास अहवाल शनिवारी सादर करा, असे आदेश आयोगाने चुनाभट्टी पोलिसांना दिले. गुन्ह्य़ात हत्येचे कलम जोडण्याची सूचनाही आयोगाने पोलिसांना केली. पीडित तरुणीचा मृत्यू होऊन चार दिवस लोटले असून अद्याप तिचा मृतदेह घाटी रुग्णालयाच्या शवागारात आहे. आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला असला तरी पोलीस हलायला तयार नाहीत. संशयित तरुणांची नावे देऊनही पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही, असा आरोप तरुणीच्या कुटुंबाने केला असून यावरून आंदोलन करण्यात येत आहे.
जालना येथून दोन महिन्यांपूर्वी मुंबईत नातेवाईकांकडे वास्तव्यास आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल आहे. प्रकृती खालावली म्हणून या तरुणीला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुणीवर लैंगिक अत्याचार घडल्याचे तेथील डॉक्टरांच्या तपासणीत आढळले. तरुणीने आपल्यावर ७ जुलैला चेंबूर परिसरातील चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे आई -वडिलांना सांगितले. त्यानंतर या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नंतर ते चुनाभट्टी पोलिसांकडे वर्ग केले गेले.
प्रत्यक्षात हा गुन्हा चुनाभट्टी पोलिसांकडे वर्ग झाल्यावर एक पथक औरंगाबादला तरुणीचा जबाब नोंदवण्यासाठी रवाना झाले. मात्र तोपर्यंत तरुणी बेशुद्धावस्थेत गेली होती. ती शुद्धीवर आलीच नाही. त्यामुळे पोलीस तिचा जबाब घेऊ शकले नाहीत. गुन्हा दाखल झाल्याचे आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती तिने प्रकृती खालावलेल्या अवस्थेत वडिलांना दिली. त्यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, या प्रकरणी महिला आयोगाने शुक्रवारी पोलिसांना नोटीस बजावत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. हत्येचे कलम जोडण्याबरोबरच तरुणीच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतील तरतुदींनुसार आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा शिफारशी केल्या आहेत.
पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यात खासदार सुप्रिया सुळे, आमदार विद्या चव्हाण, पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक सहभागी झाले होते. त्यानंतर खासदार सुळे यांनी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आणि आरोपींना त्वरित अटक करण्याची, त्याचबरोबर तरुणीच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. तसेच शुक्रवारी संध्याकाळी सामाजिक, राजकीय संघटनांनी शीव-पनवेल महामार्गावर आंदोलन केले. यावेळी रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला. पीडीत तरुणीच्या नातलगांनीही गुरुवारी आंदोलन केले होते.