मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण : आरोपी अटक झाल्याशिवाय ” त्या ” पीडितेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, मुंबई , औरंगाबादेत आंदोलन

मुंबईत चार नराधमांच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या जालन्यातील तरुणीचा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात काल मृत्यू झाल्यानंतर पिडीतेच्या नातेवाईकांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्याने आज रात्रीही पिडीतेचा मृतदेह घाटी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईहून आलेले पथक रात्री १० .३० च्या सुमारास पोहोचले. हे पथक येईपर्यंत पिडीतेच्या मृतदेहाचे शव-विच्छेदन करण्यात आलेले नव्हते. यावेळी बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक घाटी पोलीस चौकीत उपस्थित होते. पिडितेचा भाऊ उद्या सकाळी औरंगाबादेत पोहचत आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार प्रशांत बंब यांनी घाटी रुग्णालयात धाव घेऊन या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन पिडीतेच्या भावाशी चर्चा करून कारवाईची माहिती घेतली आणि पीडितेवर कुठलाही अन्याय होणार नाही याची लोकप्रतिनिधी या नात्याने आपण पूर्ण सहकार्य करू असे सांगितले. यावेळी त्यांनी पोलिसांशी आणि डॉक्टरांशीही चर्चा केली.
मुंबईत आपल्या भावाकडे आलेल्या या तरुणीवर चार जणांनी गुंगीचं पेय देऊन बलात्कार केल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी औरंगाबादेतील बेगमपुरा पोलिसांना दिली होती मात्र सदर गुन्हा मुंबईत चुना भट्टी पोलिसांच्या हद्दीत घडल्याने सदर गुन्हा बेगमपुरा पोलिसांनी संबंधित पोलिसांकडे तातडीने वर्ग केला होता. मुंबई पोलिसांची एक टीम अधिक तपासासाठी औरंगाबादला आलीही होती मात्र सदर मुलगी बेशुद्धावस्थेत असल्याने तिचा जबाब पोलीसांना घेता आला नाही. त्यामुळे नेमका प्रसंग कसा घडला याची माहिती पोलिसांना मिळाली नाही. अखेर पीडितेशी मृत्यूशी चालू असलेली झुंज अशा रीतीने संपली.
आज दिवसभरात औरंगाबाद पोलीस आणि घाटी प्रशासनाने पिडीतेच्या कुटुंबीयांची वाट पाहिली परंतु या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पीडितेच्या मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका पीडितेच्या भावांनी घेतली असल्याने पोलीस तिच्या भावांच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान पीडितेच्या मृत्यूची माहिती मिळताच मुंबईच्या कार्यकर्त्यांनी चुना भट्टी पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन केले. या आंदोलकांनी तपासकामी चुनाभट्टी पोलिसांवर तर घाटी हॉस्पिटलचे संबंधित वॉर्डाचे प्रमुख यांनी पीडितेवर उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे प्रमुख , या प्रकरणातील चौकशी अधिकारी आणि इन्चार्ज डॉक्टर यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तशी पीडितेच्या भावाची तक्रार नोंदवून घ्यावी अशी मागणी केली.
या सर्व प्रकरणात चुनाभट्टी पोलिसांकडून गांभीर्याने कारवाई करण्यात अली नाही या उलट आपण पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलो असता आपणास अवमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप पीडितेच्या भावांनी केला आहे. औरंगाबादेतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या छाया जंगले उद्या सकाळी या प्रकरणात शहागंज येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी कि , जुलै महिन्यात पीडित मुलगी आपल्या भावाकडे मुंबईत आली होती . याच काळात दिनांक ७ जुलै रोजी सदर तरुणीला फोन आल्यामुळे ती मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेली होती . रात्री घरी आल्यानंतर ती घरात कोणाशीही बोलली नाही . दरम्यान तिची प्रकृती अधिकच खालावल्याने तिच्या भावाने वडिलांना मुंबईला बोलावून मुलीला गावाकडे जालन्याला पाठवले होते. गावाकडेहीही प्रकृतीत सुधारणा होत नाही म्हणून तिच्या आई -वडिलांनी तिला पुढील उपचारार्थ घाटी रुग्णालयात २७ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. तपासणीच्या दरम्यान मुलीच्या वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने बेगमपुरा पोलिसांना याविषयी लेखी कळविले होते .