उमेदवार कोणीही असू द्या मी जिंकणारच : खा . चंद्रकांत खैरे

‘आता कोणीही उमेदवार आला तरी फरक पडणार नाही, मी जिंकणारच,’ असा दावा खा . चंद्रकांत जाहीर यांनी पत्रकारांशी बोलताना केला . कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांची समजूत काढण्याची जबाबदारी त्यांचे सासरे भाजप नेते खा. रावसाहेब दानवे यांची आहे आमची नाही असेही एका प्रश्नाच्या उत्तरात खैरे म्हणाले .
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. ते म्हणाले, अशी चर्चा आहे की, कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या बाबतीत आणि खासदार रावसाहेब दानवे यांना वरिष्ठ पातळीवरून बोलावण्यात आले होते. तुमचे जावई जे करत आहेत ते अयोग्य असल्याचे दानवे यांना समजावले आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी भाजपला खासदारांची संख्या वाढवावी लागणार असून त्यांना प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून दानवे यांनी जाधव यांचे कान टोचले आहेत. परिणामी, येत्या निवडणुकीत जाधव यांचा अडसर राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. ‘आता कोणीही उमेदवार आला तरी फरक पडणार नाही, मी जिंकणारच,’ असा दावा केला. निवडणुकीत भाजप पदाधिकारी तुमचे काम करणार काय? या प्रश्नावर युती झाली नसती तरी भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे काम केले असते, असे अनेक पदाधिकारी फोन करून सांगत आहेत, असे त्यांनी सांगितले.
‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपैकी कोणाला जागा सुटणार याचा निर्णय अद्याप झाला नाही. राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या विरोधातील गटासोबत अनेक बैठका झाल्या आहेत. काँग्रेसचे शिष्टमंडळही दोन दिवस दिल्लीला माझ्या निवासस्थानी होते,’ असा दावा खैरे यांनी केला. अर्जुन खोतकर कुठेही जाणार नाहीत. ते फक्त बोलतात. ते फुटू शकत नाहीत. त्यांना कॅबिनेट किंवा इतर काही मिळण्याची अपेक्षा आहे. युती झाली तरी मोठा भाऊ म्हणून शिवसेनेचे अस्तित्व दाखवून दिले जाईल, या दिशेनेचे काम करण्यात येईल, असे खैरे यांनी स्पष्ट केले. शिवसेना-भाजपचे फिस्कटल्यानंतर जिल्हा परिषद, तसेच काही नगर पालिकांमध्ये शिवसेना-काँग्रेसची युती झाली आहे. आता पुन्हा भाजप- शिवसेनेचे जमल्यामुळे काँग्रेस सोबतच्या युतीचे काय?, असा प्रश्न विचारला असता, आता आम्ही भाजप सोबत युती केली आहे. जर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला तरच तेथे निवडणुका होतील अन्यथा कालावधी पूर्ण होईपर्यंत ते खुर्ची सोडणार नाहीत, असे खैरे यांनी स्पष्ट केले.