Aurangabad : प्रवाशांना लुटणारे दोघे अटकेत

प्रवाशांची लुटमार करणा-या रिक्षा चालकासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. लुटमारीचा प्रकार १४ आॅगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास कर्णपुरा मैदानात घडला. रवि शेषराव खैरे (२३, रा. नारेगाव) यांना वोखार्ड कंपनीसमोरुन रिक्षा चालकाने (एमएच-२०-ईएफ-५७३२) प्रवासी म्हणून बसवले. त्यानंतर रिक्षा चालक सचिन अशोक शिंदे (२८, रा. भक्तीनगर, रामनगर, तानाजी चौक) आणि आकाश विनायक निकाळजे (२३, रा. गल्ली क्र. ४, संजयनगर, मुकुंदवाडी) यांनी कर्णपुरा मैदानात निर्मनुष्य ठिकाणी नेऊन मारहाण केली.
यावेळी दोघांनी मोबाईल आणि दोन हजार रुपये हिसकावून घेतले. हा प्रकार घडल्यानंतर खैरे यांनी छावणी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. रिक्षा चालकाचा शोध सुरू असताना त्यांना कर्णपुरा मैदानात गुरुवारी सकाळी पकडण्यात आले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.