अटारी -वाघा बॉर्डरवरील ‘बीटिंग द रिट्रीट’चा दिमाखदार सोहळा थरारक कवायतींनी रंगला,

देशभरात ७३ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतानाच भारत-पाक सीमेवरील अटारी बॉर्डरवर ‘बीटिंग द रिट्रीट’चा दिमाखदार सोहळा रंगला. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण असतानाही दोन्ही देशाच्या जवानांनी चित्तथरारक कवायती सादर केल्या. हा सोहळा बघण्यासाठी दोन्ही देशांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर बॉर्डरवर जमले होते. दोन्ही देशांचे जवान समोरासमोर येताच नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे स्वागत केले. यावेळी भारतीयांनी ‘भारत माता की जय’चा जयघोष करून संपूर्ण अटारी बॉर्डर दणाणून सोडली.
भारताने जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमकी झडत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीटिंग द रिट्रीट सोहळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. मात्र दोन्ही देशांच्या जवानांनी अटारी-वाघा बॉर्डवर थरारक कवायती केल्या. या सोहळ्या दरम्यान जवानांमध्ये कोणताही ताणतणाव पाह्यला मिळाला नाही. जवानांच्या प्रत्येक कवायतींना दोन्ही देशांचे नागरिक टाळ्या वाजवून प्रचंड प्रतिसाद देत होते. दोन्ही देशांतील नागरिकांकडून या सोहळ्या दरम्यान घोषणाबाजी करण्यात येत होती. भारतीयांनी तर ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’चा जयघोष करत अटारी बॉर्डर दणाणून सोडली. यावेळी बॉर्डरवर विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
अटारी- वाघा बॉर्डरवर दोन्ही देशांचे ध्वज उतरविण्याची पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी हा सोहळा विशेष पाहण्यासारखा असतो. भारतीय सैन्यदलाचं रौद्ररूप काय असतं ते यावेळी पाहता येतं. आजही हजारो लोकांनी हा अनुभव घेतला. अटारी पंजाबच्या अमृतसरमध्ये असून लाहोरमध्ये वाघा आहे.