भारतातील ऑटो सेक्टरमध्ये वर्षभरापासून मंदी, अनेक तरुणांवर नोकऱ्या गमावण्याची पाळी

भारतातील ऑटो सेक्टरमध्ये गेल्या वर्षभरापासून मंदी आली आहे. १९ वर्षात पहिल्यांदाच अशी मंदी आली असून गेल्या दोन-तीन महिन्यात १५ हजार जणांना नोकऱ्या गमावण्याची पाळी आली आहे. ऑटो इंडस्ट्रीच्या ‘एसआयएम’च्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. सोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाइल मॅन्यूफॅक्चर्स (SIAM) ने आज हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. गाड्यांची विक्री, प्रवासी गाड्या, दुचाकींची विक्री यांचा यात समावेश आहे. २०१८ मध्ये या गाड्यांची विक्री २२ लाख ४५ हजार २२४ होती. परंतु, ती आता यावर्षी केवळ १८ लाख २५ हजार १४८ वर खाली आली आहे. डिसेंबर २०००मध्ये सर्वात जास्त ऑटो सेक्टरमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. त्यावेळी २१.८१ टक्के व्यापारात घट झाली होती. १९ वर्षानंतरची सर्वात मोठी मंदी आली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा)च्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यात अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे, असे म्हटले आहे.
ऑटो सेक्टरमध्ये ३.७ कोटी लोकांना नोकऱ्या आहेत. काही महिन्यात मंदी संपली नाही तर आणखी काही लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये जीएसटीचे दर २८ टक्के आहेत ते दर १८ टक्क्यांवर आणायला हवेत, अशी मागणी ऑटो इंडस्ट्रीकडून करण्यात आली आहे. जुलै २०१८ ते २०१९ या दरम्यान फायनान्स सेक्टरमध्ये म्यॅच्यूअल फंडाची गुंतवणूक ६४ हजार कोटींनं कमी झाली आहे. देशांतर्गत बाजारात ५१ टक्के शेअर्स असलेली मारूती सुझुकीने जानेवारीमध्ये १.४२ लाख कारची विक्री केली. परंतु, सहा महिन्यात तिची विक्री ३१ टक्के कमी झाली आहे. जुलै महिन्यात केवळ ९८,२१० कारची विक्री झाली आहे. मारुतीनंतर ह्युंदाईच्या विक्रीतही घट झाली आहे. ह्युंदाईने जानेवारीत जवळपास ४५ हजार कारची विक्री केली, परंतु, १५ टक्के विक्रीत घट झाल्याने जुलै महिन्यात केवळ ३९ हजार विक्री झाली, असे या अहवालात म्हटले आहे.