काँग्रेसने केली १०० टक्के कर्ज माफीची आणि पुर्नवसनाची मागणी

पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीवर मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. ते म्हणाले, पूराची परिस्थिती गंभीर आहे. आता पूर ओसरल्यानंतर संकटं मोठी आहेत. असं असलं तरी प्रशासन अद्याप गतीने काम करत नाही. यामुळे स्थानिक लोक नाराज आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हवाई पहाणीपेक्षा अलमट्टी धरणातून लवकर पाणी सोडले असते, तर संकट कमी झालं असतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
मोठं नुकसान झालं तिथं केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी. पाच हजार मदतीने काहीच होणार नाही. त्यांच पुर्नवसन होणे गरजेचं आहे. संपूर्ण कर्जमाफी झाल पाहीजे. जनावरांसाठी मदत दिली पाहिजे. इचलकरंजीतील कापड उद्योजकांना मदत होणे गरेजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पूरग्रस्त भागात काँग्रेस कंट्रोल रुम तयार करणार असून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे तिथे थांबतील असंही थोरात यांनी सांगितलं. संकटाचं गांभीर्य सरकारला लक्षात आलं नाही. प्रशासन पातळींवर धोरण फसलं आहे. पालकमंत्र्यांचं लक्ष नव्हतं. संकटात जनतेबरोबर राहीलं पाहिजे ते काम सरकारनं केलं नाही असा आरोपही त्यांनी केलं.
कोल्हापूर ही अमित शहांची सासुरवाडी आहे. त्यामुळे तरी त्यांनी जास्त मदत करावी फक्त हवाई पाहणी करू नये असा टोलाही त्यांनी शहांना लगावला. अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर, सांगली, कराड आणि बेळगावच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली होती.