जम्मू काश्मीर मधील हिंदू, शिख गटांचाही ३७० हटविण्याला विरोध, ६४ दिग्गजांचे निवेदन

हटवण्याच्या केंद्रातील भाजप सरकारच्या निर्णयाला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होत असतानाच, जम्मू-काश्मीरमधील , डोगरा आणि शीख समुदायातील काही गटांनीही विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी आणि असंवैधानिक असल्याचं या गटांचं म्हणणं आहे.
काश्मिरी पंडित, डोगरा आणि शीख समुदायातील काही गटांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध केला असून, तसं पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यावर या गटांमधील ६४ दिग्गज मंडळींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, असं एका वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ उपेंद्र कौल, एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) कपिल काक, पत्रकार प्रदीप मॅगेझिन, शारदा उग्रा आणि अनुराधा भासिन या दिग्गजांसह विद्यार्थी, कलाकार आदींच्या या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत. केंद्रानं हा निर्णय बळाचा वापर करून घेतला आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत आणि हा निर्णय असंवैधानिक आहे. विधानसभेचे मत किंवा मंजुरी न घेताच केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी पत्रकात नमूद केलं आहे.
जम्मू-काश्मीरमधील लोकांना लादलेल्या बंधनातून तात्काळ मुक्त करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. मनमानी आणि अवैधपणे अटक करण्यात आलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची सुटका करण्यात यावी, असं या गटांनी पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या विभाजनानं आम्ही खूप दुःखी झालो आहोत. अशा काळात आपल्या सर्वांना एकत्र राहायला हवं असं आवाहनही त्यांनी राजकीय पक्षांना केलं आहे. जात-धर्म, सांस्कृतिक आधारावर विभाजन करण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही त्याला विरोध करू, असा निर्धारही त्यांनी केला.