विमानतळांवर दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यतेमुळे विमानतळांवरील सुरक्षेत वाढ

१५ ऑगस्टला असणाऱ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान विमानतळांवर दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यतेने नागरी हवाई वाहतूकीची सुरक्षा सांभाळणाऱ्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी (बीसीएएस) ने मुंबईसह देशभरातील विमानतळांनाअतिदक्षतेचा इशारा दिला आहे. देशातील हवाई वाहतूक क्षेत्राला वाढलेल्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.१० ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत विमानतळावर आगंतुकांना प्रवेश दिला जावू नये असे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथक, जलद कृती दलांना सर्व विमानतळांवर कार्यरत करावे, निरीक्षण वाढवावे, विमानतळाकडे जाणाऱ्या नाक्यांवर वाहनांची व नागरिकांची तपासणी करावी, कार्गो टर्मिनलवरील सुरक्षेत वाढ करावी, सशस्त्र जवानांनी यावर लक्ष ठेवावे, टर्मिनल इमारत, ऑपरेशनल विभाग यामध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, प्रत्येक प्रवाशावर लक्ष ठेवावे, विमानतळाच्या इमारतीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक तैनात ठेवावे, टर्मिनल इमारतीजवळ कोणतेही वाहन पार्क करण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी, पार्किंगमध्ये लक्ष ठेवावे, टर्मिनल इमारतीत येणाऱ्या प्रत्येकावर बारीक लक्ष ठेवावे, विमानतळावर येणाऱ्या वाहनाची पूर्ण तपासणी करावी, चालकाचे ओळखपत्र तपासावे, हवाई रुग्णवाहिका (एअर अॅम्ब्युलन्ससहित) वेळापत्रकात नसलेल्या विमानांच्या उड्डाणांवर व आगमनावर लक्ष ठेवावे, विमानात कोणतीही अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही याची काळजी घ्यावी, बॅगेज क्षेत्रावर देखील लक्ष ठेवावे, अशा विविध सूचना बीसीएएसच्या उप संचालक सी.के. रंगा यांनी दिल्या आहेत.
विमानतळावरील सुरक्षेसोबत कोणतीही त्रुटी होणार नाही याची काळजी घ्यावी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) मुख्य विमानतळ सुरक्षा अधिकारी, बीसीएएसचे विभागीय संचालक यांनी परिस्थितीचा व्यक्तिश: आढावा घ्यावा व सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करावी असे निर्देश बीसीएएसच्या संचालकांकडून देण्यात आले आहेत. विमानतळांसोबत एअरिस्ट्रप, फ्लाईंग स्कूल, हवाई वाहतूक प्रशिक्षण केंद्रांवरील सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.