Aurangabad Crime : वामन हरी पेठे फसवणूक प्रकरणातील चौघांचा जामीन फेटाळला, भारती जैन अद्यापही फरार

भारती जैन अद्यापही फरार
वामन हरी पेठे ज्वेलर्समधुन ६५ किलो वजनाचे सोन्याचे व हिरेजडीत दागीने लांबविल्याप्रकरणी राजेंद्र जैन याच्यासोबत त्याची पत्नी भारती राजेंद्र जैन हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी भारती जैन हिला अटक न केल्यामुळे ती अद्यापही फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
औरंंंगाबाद : समर्थनगरातील वामन हरी पेठे ज्वेलर्स मधुन ६५ किलो वजनाचे सोन्याचे तसेच हिरेजडीत दागीने लंपास केल्या प्रकरणी हर्सुल कारागृहात असलेल्या चौघांचा नियमित जामीन अर्ज मंगळवारी (दि.६) मुख्य न्यायदंडाधिकारी एम.ए.मोटे यांनी पेâटाळला.
समर्थनगरातील वामन हरी पेठे ज्वेलर्समधुन ६५ किलो वजनाचे सोन्याचे तसेच हिरेजडीत दागीने व्यवस्थापक अंकुर अनंत राणे, राजेंद्र किसनलाल जैन, लोकेश पवनकुमार जैन यांनी लांबविल्याचा धक्कादायक प्रकार ४ जुलै रोजी समोर आला होता. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अंकुर राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन यांना अटक केली होती. चौकशीदरम्यान राजेंद्र जैन याने सराफ्यातील जडगाववाला ज्वेलर्सचे राजेश मन्नालाल सेठीया यांच्या मदतीने सोन्याची विल्हेवाट लावली असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिसांनी राजेश सेठीया याला देखील अटक केली आहे. अटकेत असलेले चौघे सध्या हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, अंकुर राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन, राजेश सेठीया यांनी नियमित जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मंगळवारी मुख्य न्यायदंडाधिकारी एम.ए.मोटे यांच्यासमोर सुनावणी झाली. अटकेत असलेले आरोपी जामीनावर सुटल्यावर पुरावे नष्ट करू शकतात असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केल्यानंतर न्यायदंडाधिकारी मोटे यांनी चौघांचा नियमीत जामीन अर्ज पेâटाळला.