NewsUpdates : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाल्याचे वृत्त असून त्यांना पाहण्यासाठी एम्स हॉस्पिटलमध्ये नेत्यांनी धाव घेतली आहे. मृत्युसमयी त्या 67 वर्षांच्या होत्या. पक्षात त्यांना अत्यंत आदराचे स्थान होते.
गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती बरी नव्हती त्यामुळे 2019 च्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता तसेच त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता.
आज अखेर त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे अखेरपर्यंत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. काल जम्मू आणि काश्मीर येथील 370 व्या कलमाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी आपली प्रतिक्रिया देऊन शासनाचे अभिनंदन केले होते.
दरम्यान एएनआयने मात्र सुषमा स्वराज यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांना एम्स मध्ये दाखल केले असल्याचे वृत्त दिले आहे काँग्रेसने मात्र आपल्या ट्विटर हँडल वरून सुषमा स्वराज यांना आदरांजली अर्पण केली आहे.
सुषमा यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचे आधीच निधन झाल्याचे स्पष्ट झाले. सुषमा यांच्या निधनाचे वृत्त येताच राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह केंद्र सरकारमधील अनेक वरिष्ठ मंत्री तातडीने एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.