२,१७७ कुटुंबातील सुमारे ६ हजार ग्रामस्थांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

कोल्हापूरमध्ये गेल्या १२ दिवसांपासून पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीत महापूरआला आहे. नद्या, नाले आणि तलाव दुथडी भरून वाहू लागल्याने या दोन्ही जिल्ह्यातील पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले असून घराघरात पाणी शिरल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे सांगली आणि कोल्हापूरचा अनेक गावांशी संपर्कही तुटला आहे. गेल्या दोन दिवसात आपत्ती निवारण पथक आणि एनडीआरएफच्या पथकांनी युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेऊन आतापर्यंत २,१७७ कुटुंबातील सुमारे ६ हजार ग्रामस्थांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच आज कोल्हापुरातील ८२४ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथे पुराचे पाणी वाढले असून पोलीस या नागरिकांची पुरातून सुटका करत आहेत.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे दोन्ही उपसा केंद्र पाण्यात बुडाल्याने बुडाल्यांने सोमवारी महापालिकेची संपूर्ण यंत्रणाच कोलमडली. कळंबा तलावातून होणारा पाणीपुरवठा वगळता अन्य कोणत्याही भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पाऊस असूनही शहरवासियांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे तसेच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील पूरातून ग्रामस्थांची सुटका करण्यासाठी मुंबईतील तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना झाले आहे. तर एनडीआरएफच्या टीमने रबरी बोटीच्या सहाय्याने पुरात अडकलेल्यांची सुटका करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे.