ब्राह्मण फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिले, कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला असे वक्तव्य पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केल्यानंतर आता ‘ब्राह्मण फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस कायद्याच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण देऊ शकली नाही,’ असे उद्गार माथाडी कामगार नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
नरेंद्र पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना सातारा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. पण राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा पराभव करणं त्यांना शक्य झालं नाही. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र पाटील हे पुन्हा एकदा चांगलेच सक्रिय झाले आहेत. बीडमधील पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील यांनी सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलं.
‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील ६ हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना ३५० कोटी रुपयांचा कर्ज वाटप केलं आहे. या कर्जाचा परतावादेखील चांगला असून बँकांना सरकार व्याज परतावा देखील देत आहे. या लाभार्थ्यांनी कर्जफेड वेळेत केल्यास त्यांच्यावरील बँकांचा विश्वास देखील वाढेल आणि त्यांना वाढीव कर्ज मिळू शकेल,’ असा दावा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, नरेंद्र पाटील हे दोन दिवस बीड जिल्हा दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी विविध बँकांच्या जिल्हा समन्वयक यांची आढावा बैठक घेतली. तसेच लाभार्थींच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बैठकीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण, जिल्हा सहनिबंधक सहकारी संस्था श्री. बडे यासह जिल्ह्यातील विविध बँकांचे जिल्हा समन्वयक आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.