Social Media : मकरंद अनासपुरे पोलीस ठाण्यात का गेले ?

अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या छायाचित्राचा वापर करून राजकीय मतमतांतरे सोशल मीडियावर व्हायरल करत जनमानसात त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रकार सुरू असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.
राजकीय मतांसाठी अनासपुरे यांच्या सिनेमातील छायाचित्रांचा वापर होत असून या छायाचित्रांची छेडछाडही करण्यात आलेली आहे. मागील सहा ते आठ महिन्यांपासून अशा कमेंटस व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे अनासपुरे फेसबुकचा वापर करत नाहीत. मात्र त्यांना फेसबुकवरील वादग्रस्त पोस्टविषयी काही जणांकडून माहिती मिळाली. त्यांच्या व्हॉट्सअपवरही या राजकीय पोस्ट आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार केली. या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहे.
कोणताही संदर्भ नसलेली राजकीय मते मी मांडलेली नाहीत. माझ्या छायाचित्रांचा वापर करण्यात आलेला आहे. विनोदापर्यंत कमेंट ठीक आहेत. मात्र राजकीय मते मला नकोत. माझ्या अनुमतीशिवाय कमेंट करण्यात आलेल्या असून यामुळे विनाकारण राजकीय भूमिका तयार होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. वेगळा संदेश जाऊ नये यासाठी मी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.