अर्थव्यवस्था रुळावरुन घसरलीय, मंदीची ट्रेन पूर्ण वेगात येतेय – राहुल गांधी यांचे ट्विट

Mr PM, The economy has derailed and there seems to be no light at the end of the tunnel. If your incompetent FM is telling you there is light, trust me it’s the train of recession coming at full throttle.https://t.co/ewoVj5m27X
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 1, 2019
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी एक न्यूज रिपोर्ट टि्वट करुन भारतीय अर्थव्यवस्था रुळावरुन घसरल्याचा आरोप केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची जी स्थिती आहे त्यामध्ये मंदीची ट्रेन पूर्ण वेगात येत आहे असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर राहुल यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावरही अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला आहे. मिस्टर पीएम, अर्थव्यवस्था रुळावरुन घसरली असून बोगद्याच्या शेवटी कुठलाही प्रकाश दिसत नाहीय. तुमच्या अकार्यक्षम अर्थमंत्री तुम्हाला प्रकाश आहे असे सांगत असतील तर माझ्यावर विश्वास ठेवा मंदीची ट्रेन पूर्ण वेगात येत आहे असे राहुल यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. देशातील प्रमुख आठ क्षेत्रांची वाढ यंदाच्या जूनमध्ये शून्यावर स्थिरावली आहे. तेल तसेच सिमेंट उत्पादन रोडावल्याने जून २०१९ मध्ये एकूण पायाभूत क्षेत्र ०.२ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यापार्श्वभूमीवर राहुल यांनी हे टि्वट करुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.