सुप्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे कालवश, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी.. गीत ऐका

रोज तुझ्या डोळ्यात रिमझिमणारा श्रावण मी’ आणि ‘त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी’ अशा सदाबाहार गीतांनी आणि गझलांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध कवी आणि गझलकार अनिल कांबळे यांचे आज (गुरूवारी) निधन झाले. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांबळे हे आजारी होते. पंरतु त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती. काही दिवसांनी पुन्हा त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. अखेर गुरूवारी त्यांची प्राणज्योत मालवली. साध्या, सोप्या भाषेत आशय मांडणारे म्हणून ते प्रसिद्ध होतेच. ‘त्या कोवळ्या फुलांचा’ ही त्यांची गाजलेली गझल आहे. श्रीधर फडके यांनी त्यांची ही गजल स्वरबद्ध आणि संगीतबद्धही केली होती. अनिल कांबळे हे अभिजात कला अकादमी अध्यक्ष तसेच युनिव्हर्सल पोएट्री फाऊंडेशनचे संस्थापकही होते. अनुप जलोटा, शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, सलील कुलकर्णी यांच्यासह अनेकांनी त्यांची गीते स्वरबद्ध केली आहेत. तर आनंद मोडक, श्रीधर फडके, यशवंत देव यांनी त्यांची गाणी संगीतबद्ध केली आहेत.
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला
पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी
अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा श्रृंगार पाहिला मी
रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतू
वस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी
थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी