Good News : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात , महिनाभरात १६३ रुपयांनी सिलिंडर झाले स्वस्त

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने खूशखबर दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्याने देशात घरगुती विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात तब्बल ६२.५० रुपयांची कपात झाली आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
वर्षाला १२ अनुदानित सिलिंडर्सचा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर घ्यावा लागतो. मात्र, ज्या ग्राहकांचा हा कोटा शिल्लक आहे अशांनाही याचा फायदा मिळणार आहे. नव्या दरांमुळे १४.२ किलोच्या अनुदानित सिलिंडरचा दर आता ५७४.५० रुपये इतका असणार आहे, अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिली.
गेल्या महिन्यात विनाअनुदानित घरगुती सिलिंडरच्या दरात १००.५० रुपयांनी मोठी कपात केंद्र सरकारने केली होती. आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी ६२.५० रुपयांची कपात झाल्याने सुमारे एका महिन्यात सिलिंडरचे दर हे तब्बल १६३ रुपयांनी कमी झाले आहेत.