आजपासून देशातील पहिली महिला सैन्य भरती , देशात एकूण ५ ठिकाणी ही भरती प्रक्रिया

देशात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सैन्यदलाच्या महिला पोलीस भरतीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बेळगाव येथे १ ते ५ ऑगस्ट दरम्यान मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या शिवाजी स्टेडियमवर भरतीची प्रक्रिया होणार आहे,अशी माहिती ब्रिगेडियर दिपेंद्र रावत यांनी पत्रकारांना दिली.
सैन्यातील महिला पोलीस पदासाठी एकूण पंधरा हजारांहून अधिक अर्ज आले होते. दहावीच्या गुणांच्या आधारावर छाननी करून ३ हजार उमेदवारांची शारीरिक चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. महिला सैन्य भरतीसाठी शिवाजी स्टेडियमवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. धावणे,लांब उडी आणि उंच उडी अशा शारीरिक चाचण्या शिवाजी स्टेडियमवर पहिल्यांदाच घेण्यात येणार आहेत. त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि लेखी परीक्षा शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना द्यावी लागणार आहे अशी माहितीही रावत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेंगळुरुहून लष्करी अधिकारी ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बेळगावात दाखल झाले आहेत. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, अंदमान निकोबार येथील उमेदवारांसाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. देशात एकूण ५ ठिकाणी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे निवड प्रक्रियेच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्त तसेच महिला पोलिसही येथे तैनात करण्यात येणार आहेत.