छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

छेडछाडीला कंटाळून 10 वीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. सतत होत असलेल्या छेडछाडीमुळे स्वाती घोळवे या बीडच्या केज तालुक्यातील विद्यार्थीने चार दिवसांपूर्वी विष प्राषण केलं होतं, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
केज तालुक्यातील गप्पेवाडी गावात राहणाऱ्या स्वाती घोळवे हिला एक तरूण सतत त्रास देत होता. या त्रासामुळे स्वातीनं शाळेत जाणंही बंद केलं. पण तरीही संबंधित मुलाकडून होणारा त्रास थांबला नाही. त्यामुळे या छेडछाडीला कंटाळलेल्या स्वातीनं टोकाचं पाऊल उचलत चार दिवसांपूर्वी विष प्राषण केलं. त्यानंतर उपचारासाठी तिला रुग्णायलातल दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला आहे. स्वाती ही शिक्षणासाठी मामाच्या गावामध्ये राहत होती. तिच्यासोबत छेडछाड सुरू झाल्यानंतर तिने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. पण छेडछाड करणाऱ्या मुलाने मामासह स्वातीलाही धमकी दिली होती. या सगळ्या दबावाला कंटाळून स्वातीने आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला जात नसल्याने संतप्त नातेवाईकांनी केज पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. त्यामुळे स्वातीच्या मृत्यूनंतर तरी आरोपींना शिक्षा होणार का, हे पाहावं लागेल.