लोकसभेत मिळविलेला विजय हा ‘जश्न ए इम्तियाज’ नव्हे तर ‘जश्न ए औरंगाबाद’ : खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद शहरात रविवारी खासदार इम्तियाज जलील यांच्या विजयाबद्दल आझाद चौक येथून विजयी मिरवणूक काढण्यात आली. खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे नगरसेवक, तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही रॅली आझाद चौक, रोशन गेट, चंपा चौक, शहाबाजार, लोटाकारंजा, सिटीचौक, पोस्ट ऑफिसमार्गे भडकल गेट येथे पोहोचली. ठिकठिकाणी खासदार इम्तियाज जलील यांचे स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीची सांगता भडकल गेट येथे सभा घेऊन करण्यात आली. या विजय मिरवणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सहभागी होतील असे सांगण्यात आले होते परंतु ते या मिरवणुकीकडे लई नाहीत शिवाय वंचित बहुजनचे स्थानिक कार्यकर्तेही या सभेला उपस्थित नव्हते.
या सत्काराला उत्तर देताना खासदार इम्तियाज जलील यांनी, लोकसभेत मिळविलेला विजय हा ‘जश्न ए इम्तियाज’ म्हणून साजरा केला जात आहे परंतु हा जश्न ए इम्तियाज नव्हे तर हा ‘जश्न ए औरंगाबाद’ आहे. औरंगाबादकरांनी ऐतिहासिक बदल घडविला आहे. लोकसभेतील विजयाचे औरंगाबाद मॉडेल हे बीड, नांदेड, मालेगाव, नागपूरसह राज्यातील अन्य भागात राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली.
यावेळी बोलताना खासदार इम्तियाज जलील पुढे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीने लोकसभेत विजय मिळविला. विधानसभा निवडणुकीतही हीच युती प्रभावी ठरणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नेते एमआयएमला जातीयवादी पक्ष म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. आता त्यांच्याच पक्षातील नेते भाजपा, शिवसेनेकडे चालले आहेत. कांग्रेसने लोकसभा निवडणुकीत २५ उमेदवार विविध मतदार संघात उभे केले होते. त्यापैकी फक्त एक उमेदवार विजयी झाला आहे. एमआयएमने राज्यात एकच उमेदवार दिला होता. तो विजयी झालेला आहे.
विधानसभेशिवाय आगामी महापालिका निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम विजय मिळविणार असल्याचेही भाकित त्यांनी केले. एमआयएमकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याचेही ते म्हणाले. विदर्भातून ब्राह्मण समाजाचे काही जण, तर मराठा समाजाचेही अनेकजण एमआयएमसोबत येण्यास इच्छुक आहेत, असेही जलील यावेळी म्हणाले. दरम्यान जलील यांनी सभेत सांगितले की, पोलिसांनी शहरात नशेखोरीचे पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. माझी पिढी नशेने नष्ट होताना मी माझ्या डोळ्यासमोर पाहू शकत नाही. जर पोलिसांनी ही कारवाई केली नाही. तर पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा खासदार जलील यांनी दिला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटक शहरातील वातावरण बिघडवू पाहत आहेत. मात्र, ते बिघडणार नाही, शातता राहील याची काळजी घेण्याची जबाबदारी एमआयएमसह ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांची आहे, असेही यावेळी जलील म्हणाले.
हिरवा, निळा गुलाल उधळून एमआयएम कार्यकर्त्यांनी ‘जश्न ए इम्तियाज’ हा विजयी उत्सव साजरा केला. ४.४ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी या विजयी रॅलीला तब्बल पाच तासांचा अवधी लागला. ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण करीत ठिकठिकाणी खासदार इम्तियाज जलील यांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी टँकरच्या माध्यमातुन रॅलीत पाण्याचीही फवारणी करण्यात आली.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड आणि इच्छुक उमेदवारांची वाढलेली संख्या पाहता वंचित बहुजन आघाडीने सर्व २८८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमआयएम’ने शंभर जागांची मागणी केली असून दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते जागा वाटप निश्चित करणार आहेत. लहान-मोठ्या जातींना समान संधी देत विधानसभेत अधिक जागा जिंकण्याचे नियोजन ‘वंबआ’ने केले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी शनिवारी मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीला ग्रामीण भागातून आलेल्या इच्छुक उमेदवारांची लक्षणीय संख्या होती. दलित-मुस्लिम या हक्काच्या मतदारांशिवाय ओबीसी घटक सहाय्यभूत ठरणार असल्याचे इच्छुक उमेदवारांनी सांगितले. औरंगाबाद शहरातील तीन मतदारसंघासाठी वंचित आणि एमआयएम यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. राज्यातील १०० जागांवर ‘एमआयएम’ने दावा केला आहे. याबाबत ‘वंबआ’ आणि ‘एमआयएम’च्या वरिष्ठ नेत्यात चर्चा होऊन जागा वाटप निश्चित होणार आहे. सध्या जिल्हानिहाय आढावा घेत पक्षाकडून नियोजन करण्यात येत आहे.