काँग्रेस आमदार कोळंबकर यांचा काल मध्यान्हानंतर पक्षाचा पदाचा राजीनामा , भाजप प्रवेशाचा निर्णय

काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आपण २९ जुलै २०१९ पासून मध्यान्हानंतर पक्षाच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना दिला आहे. येत्या बुधवारी ३१ जुलै रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे . बुधवारी कोळंबकर यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे मातब्बर नेते गणेश नाईक, आमदार वैभव पिचड आणि चित्रा वाघ यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचाही आज राजीनामा दिला. कोळंबकर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते. वेळोवेळी त्यांनी त्याबद्दल जाहीर वाच्यताही केली होती. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचारही केला होता. त्यामुळे कोळंबकर शिवसेनेत जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, दोन दिवसांपूर्वीच कोळंबकर यांच्या कार्यकर्त्यांनी ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला होता.
कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघातून ते सातवेळा निवडून आले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत देशात आणि राज्यात मोदीलाट असतानाही कोळंबकर यांनी भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला होता. येत्या बुधवारी भाजपमध्ये राजकीय नेत्यांचा मेगा प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ, राष्ट्रवादीचे नेते मधूकर पिचड, त्यांचे चिरंजीव वैभव पिचड आणि कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर राष्ट्रवादीचे मातब्बर नेते गणेश नाईक आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक बुधवारी राष्ट्रवादीत जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.