परभणी : यलदरी वसाहतीत १८ वर्षीय युवकाची आत्महत्या

जिंतूर तालुक्यातील यलदरी वसाहत येथील अमर उमेश स्वामी (वय १८) या युवकाने राहत्या घरी गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी स्वामी कुटुंबातील सर्वजण काही कारणानिमित्त घराबाहेर होते. अमर स्वामी हा एकटाच घरी होता. सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास गावात असलेल्या बाजारात जाऊन दोरी खरेदी केली. घरी कोणी नसल्यामुळे दोरीच्या साहाय्याने पंख्याला लटकून गळफास घेत अमर याने आत्महत्या केली. रात्री उशीरा घरची मंडळी पोहोचल्यावर ही भयानक घटना त्यांच्या समोर आली. जिंतूर पोलिसांना याबाबतची माहिती तातडीने देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अमरने आत्महत्या का केली, याबाबतचे कारण स्पष्ट झालेले नाही.