महाराष्ट्राला लुटणाऱ्या २५० घराण्यांचा हिशोब भाजप चुकता करणार , चंद्रकांत पाटील यांची पवारांवर टीका

गेल्या साठ वर्षात राज्यातील २५० घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे. राज्यात येणारे नवीन मजबूत सरकार या घराण्यांचा हिशोब चुकता करणार आहे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. देशात ६० वर्षे कमी अधिक प्रमाणात नेहरुघराण्याने देशाची सत्ता राबवली. त्याचप्रमाणे राज्यातही शरद पवारांनी आपल्या घराण्याची सत्ता राबवली, असा आरोपही त्यांनी केला. भाजपमध्ये येण्यासाठी कोणावरही प्राप्तीकर, ईडीचा दबाव टाकला जात नसून, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमचा विचार पटल्यामुळेच ते प्रवेश करत आहेत, असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला.
चंदगडचे माजी मंत्री भरमू सुबराव पाटील यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस व राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करत असल्याने भाजप शिवसेना युतीच्या २५० जागा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तपास यंत्रणांच्या धाकाने सत्ताधारी सत्तांतर घडवताहेत, असा आरोप शरद पवारांनी भाजपवर केला होता. या टीकेचा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला.
प्रदेशाध्यक्ष पाटील पुढे म्हणाले की, गेल्या ७० वर्षात कमी अधिक प्रमाणात नेहरु कुटुंबातील व्यक्तीकडे सत्ता असावी, असा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तिकीट मिळवून दिले नाही. त्यांना पराभूत केले. त्यांना लोकसभेत बोलू दिले नाही. सरदार वल्लभभाई पटेलांना पुढे येऊ दिले नाही. काँग्रेसची हीच पद्धत पवारांनी कमी अधिक प्रमाणात राज्यात राबवली, असा आरोप त्यांनी केला. पवार आपल्या मुलीला बारामतीत तिकीट देतात. पार्थ पवारांना लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये तिकीट दिले. आता दुसऱ्या नातू विधानसभा निवडणुकीत उभा राहणार आहे. घराणेशाहीमुळे सामान्यांना तिकीट मिळत नसल्याने आज त्यांच्या पक्षातील लोक फुटून बाहेर पडत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून दोनशे ते अडीचश घराण्यांनी सत्ता चालवली, असा आरोप त्यांनी केला.