आझम खान मानसिकदृष्ट्या विकृत असून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी : सुषमा स्वराज

माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी लोकसभेत केलेल्या वादग्रस्त विधानावर चांगल्याच संतापल्या आहेत. आझम खान मानसिकदृष्ट्या विकृत असून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
‘वारंवार वादग्रस्त विधान केल्यामुळे आझम खान मानसिकदृष्ट्या विकृत असल्याचं सिद्ध होतंय. लोकसभेत बोलताना तर त्यांनी गैरवर्तन करण्याची सर्वच मर्यादा ओलांडली. त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी’ अशा आशयाची संतप्त प्रतिक्रिया स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु असताना समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लोकसभेत गदारोळ झाला. आझम खान बोलण्यासाठी उभे राहिले असता शेर बोलत त्यांनी सुरुवात केली. ‘तू इधर-उधर की ना बात कर…’ अशी सुरुवात केल्यानंतर नंतर जे काही ते बोलले त्यामुळे भाजपा खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आझम खान बोलत होते तेव्हा अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजपा खासदार रमा देवी बसलेल्या होत्या.
आझम खान यांनी रमा देवी यांच्यावर टिप्पणी करत म्हटले होते की, “तुम्ही मला इतक्या आवडता की तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहावंसं वाटतं”. रमा देवी यांनी यावर आक्षेप घेत ही बोलण्याची पद्धत नाही असं सांगितलं असता आझम खान यांनी तुम्ही खूप आदरणीय आहात, माझ्या बहिणीप्रमाणे आहात असं म्हटलं.यानंतर भाजपा खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात करत माफी मागण्यास सुरुवात केली. ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा कामकाज हाती घेतल्यानंतर त्यांनीही आझम खान यांना माफी मागण्यास सांगितलं. आक्षेपार्ह भाग कामकाजातून वगळण्यात यावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आझम खान यांनी मात्र माफी मागण्यास नकार दिला. आपण काही चुकीचं बोललो असल्यास राजीनामा देण्यास तयार आहोत असं आझम खान यांनी सांगितलं. यानंतर ते सभागृहातून बाहेर पडले.