अंबरनाथ, बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस, कल्याण-कर्जत लोकल सेवा ठप्प !! मुंबई आणि उपनगरात पाण्याचा जोर वाढला , पुढील २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई शहर आणि उपगनर तसेच ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत संततधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेत पाणी भरल्याने हा सबवे वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. भांडुपमध्ये एलबीएस मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने पाणी भरले आहे. दादर हिंदमाता, माटुंगा किंग्ज सर्कल या भागातही पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.भांडूप, अंधेरी, दादर, हिंदमाता, वांद्रे, माटुंगा, वडाळा, चर्चगेट या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे.
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात पावसानं थैमान घातलं आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं असून बदलापूर स्टेशन येथील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे.
मुंबईत विविध भागांत पाणी भरल्याने रस्तेवाहतूक मंदावली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू असून मध्य आणि हार्बर मार्गावर रखडपट्टी सुरू आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या १५ मिनिटं उशिराने धावत असून हार्बर मार्गावरही तशीच स्थिती आहे. संततधार पावसामुळे विमानतळाजवळील क्रांतीनगर वस्तीत पाणी शिरले आहे. सध्या तिथे गुडघाभर पाणी आहे. पाऊस न थांबल्यास मिठी नदीचे पाणी आणखी वाढण्याची भीती असून नदीकाठच्या वस्तीतील अनेक कुटुंबानी घरे रिकामी करून शाळेत आसरा घेतला आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हांमध्ये काही भागांत मुसळधार तर पालघर जिल्ह्याच्या काही भागांत अतिवृष्टी होऊ शकते, असे हवामान विभागाकडून पुढे नमूद करण्यात आले आहे. मुंबई आणि उपनगरांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.