विचित्र वार्ता : महिलेच्या पोटातून निघाले दिड किलोची इमिटेशन ज्वेलरी, ६० नाणी आणि घड्याळही !!

पश्चिम बंगालमध्ये एका महिलेच्या पोटातून १.६८ किलो दागिने, नाणी आणि घड्याळ बाहेर काढण्यात आल्याची अजब घटना समोर आली आहे. बिरभूम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बुधवारी रामपुरहाट सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास सव्वा तास महिलेवर शस्त्रक्रिया सुरु होती.
रुनी खातून असं या महिलेचं नाव असून ती मानसिक रुग्ण आहे अशी माहिती रुग्णालयाच्या उप अधीक्षक शर्मिला मौलिक यांनी दिली आहे. महिलेला मानसोपचार तज्ञांकडे पाठवण्यात आलं आहे. “शस्त्रक्रिया पार पडली असून महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. तिच्यावर काही दिवस मानसिक उपचार केला जाणार आहेत”, असंही शर्मिला मौलिक यांनी सांगितलं आहे.
महिलेने पोटात दुखत असल्याची तसंच सारखं उलटी आल्यासारखं वाटत असल्याची तक्रार केल्याने कुटुंबीयांनी आठवडाभरापूर्वी तिला रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांनी तपासणी केली असता महिलेच्या पोटात धातूच्या वस्तू असल्याचं लक्षात आलं. “आम्हाला महिलेच्या पोटात इमिटेशन ज्वेलरी सापडली, ज्यामध्ये चेन आणि अंगठ्या होत्या. यांचं वजन १.६८ किलो होतं. तसंच ६० नाणी एक हातातलं घड्याळही होतं”, अशी माहिती डॉक्टर सर्जरी विभागाचे प्रमुख आणि प्रोफेसर सिद्धार्थ बिस्वास यांनी दिली आहे.
महिलेने आपण या सगळ्या वस्तू गिळल्या होत्या असं सांगितलं आहे. कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, “महिला आपल्या भावाच्या कॉस्ट्यूम ज्वेलरी शॉपमध्ये बसायची. यावेळी तिथे कोणी नसताना तिने नाणी गिळली असावीत अशी शंका आहे”.
घरातील दागिने गायब होत असल्याचं महिलेच्या आईच्या लक्षात आलं होतं. पण जेव्हा कधी ते तिला विचारायचे ती रडण्यास सुरुवात करायची. “माझी मुलगी मानसिक रुग्ण आहे. गेल्या काही दिवसांपासून तिने काहीही खाल्लं तरी बाहेर पडत होतं”, असं महिलेच्या आईने सांगितलं आहे. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे.