गांधी पेक्षा सत्ता देणारा नथुराम पक्षांतर करणारांना प्रिय वाटू लागला आहे , राष्ट्रवादीतल्या आऊटगोईंगवर जितेंद्र आव्हाड

छगन भुजबळांनी वृत्त फेटाळले तर वैभव पिचडही पक्षांतराच्या पवित्र्यात
सत्ता देणारा नथुराम प्रत्येकालाच प्रिय वाटू लागला आहे असे वक्तव्य राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. राष्ट्रवादीतल्या आऊटगोईंगवर जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर सचिन अहिर राष्ट्रवादीत जातील ही अफवा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र ती अफवा नसून वास्तव आहे हे आता स्पष्ट झालं आहे कारण सचिन अहिर यांनी स्वतःच पवारांची साथ सोडत असल्याचं दुःख झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सत्ता देणारा नथुराम हा प्रत्येकालाच प्रिय वाटू लागला आहे. गांधींचे विचार आता पक्ष बदलणाऱ्यांना जुने वाटू लागले आहेत किंवा इतिहास वाटू लागले आहेत. गांधींच्या विचारांवर विश्वास ठेवून त्यांनी आयुष्यभर सत्ता उपभोगली त्यांनी आता नथुरामाच्या पायाशी लोळण घेतले आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याही शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु होती. मात्र त्यांनी हे वृत्त स्वतःच फेटाळले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मधुकर पिचड यांचा मुलगा वैभव पिचड हेदेखील भाजपाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या काही चर्चा रंगल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आऊटगोईंग का वाढलं आहे असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारला असता त्यांनी नथुराम गोडसेचा संदर्भ देत राष्ट्रवादी सोडणाऱ्यांवर टीका केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत आव्हाड यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
शरद पवार हे वयाच्या ८० व्या वर्षीदेखील आजही एका विचाराने प्रेरित होऊन ते लढत आहेत. त्यांना हे सगळं सहन करण्याचं बळ मिळो एवढीच प्रार्थना मी करु शकतो. जे पक्ष सोडून जात आहेत ते जर शरद पवार यांच्या मनाचा जराही विचार करू नये हे दुर्दैवी आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.