राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आयकर विभागाच्या रडारवर , मुलासह साडूच्या घरावरही मारल्या धाडी

कोल्हापूरच्या कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी आज, गुरुवारी सकाळी आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली. तब्बल पंधरा जणांचे पथक त्यांच्या घरातील विविध कागदपत्रांची माहिती घेत आहेत. हसन मुश्रीफ यांच्या घरासह त्यांचा माद्याळ तालुका कागल येथील खासगी साखर कारखाना तसेच त्यांच्या पुण्यातील मुलाचे घर आणि टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्याही घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याचे समजते.
हसन मुश्रीफ हे काल, बुधवारी मुंबईत होते. सकाळी ते कागल मधील निवासस्थानी पोहचले. काही वेळातच ७-८ इनोव्हा मोटारीरून प्राप्तिकर विभागाचे पथक घरी आले. तर ३०-४० जणांच्या पथकाने चौकशी सुरू केली. या ठिकाणी सांगली, सोलापूर, सातारा, ठाणे जिल्ह्यातील वाहनातून पथक आले आहेत. स्थानिक बंदूकधारी पोलीस, महिला पोलीस, स्थानिक पोलीस मोठ्या संख्येने तेथे बंदोबस्त करत आहेत. घराचा दरवाज बंद केला असून कोणालाही आत सोडले जात नाही. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याने कागल शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून त्यामुळे मुश्रीम यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.